दिल्लीहून मथुरेकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीत बसण्याच्या जागेवरून १५ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पॅसेंजरमधून प्रवास करणाऱ्या टोळक्यानं पोषाखावरून आम्ही मुस्लिम आहोत हे ओळखलं आणि टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर बीफ खाणारे म्हणून आरोप करत मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती मारहाणीत मृत्यू झालेल्या मुलाच्या भावानं दिली.

पॅसेंजरमध्ये १५ वर्षांच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या २३ वर्षांच्या शाकिरनं सांगितलं की, ”टोळक्यातील तरुणांनी आमच्या डोक्यावरील टोपी उतरून फेकून दिली. त्यानंतर माझ्या भावाची दाढी खेचायला लागले. आम्ही मुस्लिम आहोत, यावरून त्यांनी अपमानास्पद टिप्पणी केली. ‘बीफ खाणारे’ असे म्हणत आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. वल्लभगडला गाडी पोहोचली त्यावेळी त्यांनी चाकू बाहेर काढले. त्यातील एकानं जुनैदवर चाकूनं वार केले आणि त्यानंतर हाशिम आणि माझ्यावर हल्ला केला. शाकिरच्या छातीवरही सपासप वार केले. वार केल्यानंतर आरोपींनी त्यांना आसोटी स्थानकाजवळ धावत्या गाडीतून फेकून दिलं. इतर प्रवाशांच्या मदतीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात नेतानाच जुनैदचा मृत्यू झाला. दरम्यान इतर जखमींवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही गटांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. बाचाबाचीचं पर्यावसन हाणामारीत झालं आणि त्यात एकाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

वल्लभगड येथील खंदावली गावातील जुनैद, हाशिम, शाकिर मोहसिन आणि मोईन हे गुरुवारी रात्री उशिरा ईदनिमित्त खरेदी करून दिल्लीहून परतत होते. तुघलकाबाद स्थानकात चार जण पॅसेंजर गाडीत चढले. बसण्याच्या जागेवरून त्यांनी या चौघांशी वाद घातला. मोहसिन आणि इतरांनी त्यांना विरोध केला. त्या तरुणांनी बीफ बाळगल्याचा आरोप करत चौघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडीत बसलेले अन्य तरुणही एकत्र आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांनी चाकूनं मोहसिन, जुनैद, हाशिम, मोईनवर वार केले. त्यात १५ वर्षांच्या जुनैदचा मृत्यू झाला. या प्रकरणी फरीदाबाद रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून इतरांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.