पंतप्रधान मात्तिओ रेंझी यांचे राजकीय भवितव्य पणाला

देशाच्या राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या विषयावर इटलीमध्ये रविवारी सार्वमत घेण्यात आले. पंतप्रधान मात्तिओ रेंझी यांनी जनतेचा कौल सरकारच्या विरोधात गेल्यास राजीनामा देण्याची घोषणा केली असल्याने त्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.

घटनेतील प्रस्तावित सुधारणांनुसार तेथील संसदेचे वरिष्ठ सभागृह, म्हणजे सिनेटच्या अधिकारांत मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात येणार आहे. याशिवाय देशाच्या बँकिंग क्षेत्रातही मोठय़ा अडचणी असून तेथेही सुधारणांना बराच वाव आहे. ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली गेली नाही तर युरोपमध्ये आणखी एका देशात गंभीर राजकीय आणि आर्थिक संकट उभे राहणार आहे.

पंतप्रधान रेंझी यांनी घटनेच्या सुधारणांना पाठिंबा दिला आहे, तर सर्व विरोधी पक्षांनी त्याच्या विरोधात सूर लावला आहे. त्यामुळे या प्रश्नावर रविवारी मतदान घेण्यात आले. त्यात पराभव पत्करावा लागला तर पदत्याग करण्याची तयारी पंतप्रधान रेंझी यांनी दाखवली आहे.

इटलीतील साधारण ५१ दशलक्ष उमेदवार या मतदानासाठी पात्र आहेत. दुपापर्यंत त्यापैकी २० टक्के मतदारांनी मतदान केले होते. परदेशातील अनेक नागरिकांनी गेल्या काही दिवसांत पत्राने मतदान केले आहे. विविध तज्ज्ञांच्या मतानुसार आणि पाहणीनुसार ६० टक्क्य़ांहून अधिक मतदान होण्याची शक्यता आहे.

सुरुवातीच्या मतदानपूर्व चाचण्यांमध्ये विरोधकांची सरशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर ताज्या पाहण्यांमध्ये सुधारणांच्या बाजूने अधिक मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मतदानाच्या पूर्वसंध्येला मतप्रदर्शन करण्याबाबत प्रसारमाध्यमांवर बंधने घालण्यात आली आहेत. मात्र समाजमाध्यमांवरून या प्रश्नावर मोठय़ा प्रमाणात मतप्रदर्शन केले जात होते.