गुजरातमध्ये २००२ साली नरोडा पतिया येथे उसळलेल्या जातीय दंगलप्रकरणी २८ वर्षांची शिक्षा झालेल्या गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना प्रकृतीच्या कारणावरून गुजरात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
आपल्याला टीबी झाला असून नैराश्यानेही ग्रासले आहे. त्यासाठी शहरातील रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद कोडनानी यांच्या वतीने गुजरात उच्च न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य़ मानून त्यांना जामीन मंजूर केला.
२००२ मध्ये गुजरातभर उसळलेल्या जातीय दंगलींमध्येही नरोडा पतिया येथील दंगल विशेष कुख्यात ठरली होती.
या दंगलीत ९७ जण प्राणास मुकले होते. माया कोडनानी यांना या प्रकरणात २८ वर्षांची शिक्षा झाली आहे.
माया कोडनानी त्या वेळी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. त्या या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
या दंगलींप्रकरणी कोडनानी यांच्यासह बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी व अन्य २९ जणांना विविध शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. यापैकी कोडनानी यांनाच आजवर जामीन मिळाला आहे.