योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांचा आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीत समावेश असेल, तर आपण निमंत्रक म्हणून काम करू शकत नाही, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २६ फेब्रुवारीला राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवरच बुधवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी झाल्याचा गौप्यस्फोट पक्षाचे मुंबईतील नेते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांनी केला. आपल्या ब्लॉगवर त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
‘आप’मध्ये शिमगा
‘आप’मध्ये निर्माण झालेले अंतर्गत वादळ मयांक गांधी यांच्या गौप्यस्फोटामुळे नवे वळण घेण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील घडामोडींबद्दल माहिती प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याचीही शक्यता आहे.
अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’च्या निमंत्रकपदाचा राजीनामा
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मनिष सिसोदिया यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला आणि संजय सिंग यांनी त्याला अनुमोदन दिल्याचे मयांक गांधी यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. या दोघांची अशा पद्धतीने हकालपट्टी करण्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या ठरावावेळी आपण गैरहजर राहिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे दोघेही स्वतःहून राजकीय व्यवहार समितीतून बाहेर पडण्यास तयार होते. मात्र, त्यांना तसे करू न देता त्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मांडणे धक्कादायक असल्याचे मयांक गांधी यांनी म्हटले आहे.