मायावतींचा आरोप

दयाशंकर सिंह यांची अटक टाळण्यासाठी भाजपने प्रयत्न केल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केला आहे. भाजपने निलंबित केलेल्या दयाशंकर यांनी मायावतींच्या विरोधात अपशब्द वापरले होते. भाजप व सत्ताधारी समाजवादी पक्ष यांचा छुपा समझोता असल्याचा आरोप त्यांनी केला.

गुजरात व देशभरात इतर ठिकाणी दलितांवरील अत्याचारांबाबत संसदेत जाब विचारल्याने भाजप लक्ष्य वळवण्यासाठी उत्तर प्रदेशातील २०१७ च्या निवडणुकीपूर्वी लक्ष्य वळवण्यासाठी हा वाद निर्माण केल्याचा आरोप मायावतींनी केला. बसप राज्यात सत्तेत आल्यावर या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. दयाशंकर यांच्या आईने केलेल्या तक्रारीबाबत विचारले असता, माझ्याविरोधात उद्गार काढणाऱ्यांनी त्यांच्या मुलाविरुद्ध आधी कायदेशीर कारवाई करायला हवी होती, असा सल्लाही मायावतींनी दिला. तसेच सिंह यांच्या मुद्दय़ावर माझ्या विरोधात दाखल केलेला एफआयआर हा संसदेचा हक्कभंग असल्याचे मायावतींनी स्पष्ट केले. भाजपविरोधात पुढील महिन्यापासून ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ अशा मोठय़ा सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याद्वारे दयाशंकर सिंह यांची अटक टाळण्यासाठी राज्यात भाजप व सत्ताधारी समाजवादी पक्ष यांची छुपी युती उघड करणार असल्याचा दावा मायावतींनी केला.

दयाशंकर यांच्या पत्नीची तक्रार

दरम्यान, बसप कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरल्याची तक्रार दयाशंकर यांच्या पत्नी स्वाती सिंह यांनी राज्यपाल राम नाईक यांच्याकडे केली आहे. याबाबत पुराव्यांसाठी बसप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीची सीडी त्यांनी राज्यपालांकडे सादर केली. बसप नेते नसिमुद्दीन सिद्धिकी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी कुटुंबीयांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा दावा स्वाती यांनी केला आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.