सरकारचे अपयश झाकून जनतेचे लक्ष वळविण्याठी मोदी सरकार पाकिस्तानशी दहशतवादाच्या मुद्दय़ावर युद्ध करेल, असा दावा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजप व समाजवादी पक्ष दंगलीही घडवतील, असा इशाराही त्यांनी दिला.

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या पूर्व उत्तर प्रदेशातील या भागातील सभेत मायावतींनी या दोन्ही पक्षांवर  टीका केली. राज्य तसेच केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप दलितविरोधी तर समाजवादी पक्ष गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला. बसप सत्तेत आल्यावर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, असे आश्वासन दिले.

बहुजन समाज पक्षात स्थान नसलेली माणसे भाजप घेत असल्याची टीका त्यांनी केली. एकीकडे भाजप सरकारने श्रीमंतांची एक लाख १४ हजार कोटींची कर्जे माफ केली, तर दुसरीकडे गरीब आत्महत्या करत असल्याचे चित्र असल्याचे मायावतींनी सांगितले.