पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशामध्ये भारत बंदची स्थिती निर्माण केल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.  नोटाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. या नोटाबंदीचा सर्वात मोठा फटका फेरीवाले, छोटे दुकानदार आणि लघुउद्योजक यांना बसल्यामुळे देशाची अवस्था बंद असल्या सारखीच झाल्याचे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला मायावती यांनी कडाडून विरोध केला. नोटाबंदीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. देशातील ९० टक्के जनता ही एटीएमच्या आणि बॅंकांच्या रांगांमध्ये उभी आहे. मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेली वचने न पाळल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्या म्हणाल्या.

स्वीस बॅंकांमधून काळा पैसा भारतात आणू असे वचन मोदींनी दिले होते. सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे लोटली तरी देखील अद्याप काळा पैसा परत येण्याचा पत्ता नाही असे त्या म्हणाल्या. त्या उद्विग्नतेतूनिच मोदींनी नोटाबंदीचा निर्णय विचार न करता आणि घाईघाईत घेतल्याचे मायावतींनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी आपले अपयश लपविण्यासाठी हा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या.

जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला नसून केवळ राजकीय स्वार्थापोटी भाजपने हा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. जर हा निर्णय विचारपूर्वक घेतला गेला असता तर जनतेला रांगेत उभे राहावे लागले नसते असेही त्या पुढे म्हणाल्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली असून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची अवस्था दयनीय झाल्याचे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी हे कॅशलेस इकॉनोमीचा प्रचार करीत आहेत परंतु त्यांच्या या निर्णयामुळे ९० टक्के जनता गरीब झाली असल्याचे त्या म्हणाल्या. नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच आहे याचा उल्लेख त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने आधीच आपल्याकडील काळ्या पैशाची योग्य व्यवस्था लावली आणि नंतर नोटाबंदीचा निर्णय आणला असे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारच्या या अघोरी निर्णयानंतर आतापर्यंत १०० जणांचे जीव गेले आहेत तरी अद्याप केंद्राने त्यांना कुठल्याही प्रकारची मदत जाहीर केली नाही या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान मोदी गरीबांच्या समस्यांकडे लक्ष द्यायचे सोडून नाटक करीत असल्याचेही त्या म्हणाल्या.

‘बबुआ’ भी गुनहगार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची तुलना त्यांनी लहान बाळाशी केली. असे करताना त्यांनी अखिलेश यादव यांना बबुआ म्हटले. नोटाबंदीच्या निर्णयाने जनता हताश झालेली असताना त्यांची मदत करायची सोडून बबुआने जनतेवर लाठीहल्ला करण्याचे आदेश पोलिसांना दिले असे त्या म्हणाल्या. केंद्र सरकार ज्या प्रमाणात दोषी आहे त्याच प्रमाणात अखिलेश यादव यांचेही सरकार दोषी असल्याचे त्या म्हणाल्या.