दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये ‘आप’चा झालेला पराभव स्वीकारल्याचे दिसते. निवडणुकीत मिळालेल्या विजयासाठी केजरीवाल यांनी भाजपचे अभिनंदन केले आहे. दिल्लीच्या विकासासाठी माझे सरकार महापालिकांसोबत एकत्रितपणे काम करण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील महापालिका निवडणुका भाजपसहित आपने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. निवडणुकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आपला समाधान मानावे लागले आहे. निवडणुकांचे सुरुवातीचे निकाल हाती आल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाच्या पराभवास ईव्हीएम जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्याआधी केजरीवाल यांनीही ईव्हीएममध्ये फेरफार केल्याने पक्षाचा पराभव झाल्यास हा मुद्दा उचलून धरण्यात येईल, असे अलिकडेच म्हटले होते. निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत. भाजपने तिन्ही महापालिका निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. त्यानंतर अनेक आपच्या नेत्यांनी ईव्हीएम फेरफारचा मुद्दा उपस्थित केला असला तरी, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पराभव स्वीकारला आहे. त्यांनी महापालिका निवडणुकांत विजय मिळवणाऱ्या भाजपचे अभिनंदन केले आहे. तिन्ही महापालिकांमध्ये विजय मिळवणाऱ्या भाजपचे मी अभिनंदन करतो. माझे सरकार दिल्लीच्या विकासासाठी महापालिकांसोबत एकत्रितपणे काम करण्यास तयार आहे, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. महापालिका निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे. त्यापूर्वी निवडणूक निकालांचे सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचा आघाडीवर असल्याचे चित्र होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक नेत्यांनी केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर ईव्हीएममध्ये फेरफार केल्यामुळेच भाजपचा विजय झाला आहे, असा आरोप सिसोदिया यांनी केला होता. तर ही मोदी लाट नसून ईव्हीएम लाट असल्याची टीका गोपाल राय यांनी केली होती.