दिल्लीसह उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डचे ‘दुकान’ आता बंद होण्याची शक्यता आहे. पुढील १५ दिवसांत मॅकडोनाल्डने उत्तर आणि पूर्व भारतातील सर्व आऊटलेट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर व पूर्व भारतातील १६९ आऊटलेट्स बंद होणार असून, हजारो कर्मचाऱ्यांवर यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. याशिवाय मॅकडोनाल्डच्या वितरकांचेही आर्थिक नुकसान होणार आहे.

कॅनॉट प्लाझा रेस्टॉरंट लिमिटेड (सीपीआरएल) या समूहातर्फे उत्तर आणि पूर्व भारतातील आऊटलेट्स चालवली जातात. याबाबत मॅकडोनाल्ड इंडिया आणि कॅनॉट प्लाझा रेस्टॉरंट्समध्ये करारही झाला होता. या आऊटलेट्समध्ये सीपीआरएल आणि मॅकडोनाल्डची ५०-५० टक्के भागीदारी होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता आणि या वादानंतर मॅकडोनाल्ड इंडियाने कॅनॉट प्लाझा रेस्टॉरंट्ससोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. आगामी १५ दिवसांत उत्तर व पूर्व भारतातील १६९ आऊटलेट्स बंद होतील, असे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. यामुळे देशातील बहुसंख्य राज्यांमधील खवय्यांना मॅकडोनाल्डच्या बर्गर, फ्रेंच फ्राईजची चव चाखता येणार नाही. या निर्णयामुळे हजारो तरुण आणि वितरकांचा रोजगार बुडणार आहे. उत्तर आणि पूर्व भारतासाठी नवीन कंपनीचा शोध सुरु असल्याचे समजते.

दोन महिन्यांपूर्वी सीपीआरएलतर्फे दिल्लीत चालवण्यात येणारी ४३ आऊटलेट्स बंद करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने आरोग्यासंबंधी बंधनकारक असलेल्या परवान्याचे नुतनीकरण न झाल्याने हे आऊटलेट्स बंद केले होते.