वैद्यकीय शाखेतील प्रवेश घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी ओडिशा हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश इशरत मसरुर कुद्दूसी यांच्यासह पाच जणांना अटक केली. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यावरही आरोपींनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला परवानगी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयने कुद्दूसी आणि अन्य आरोपींच्या घरावर छापे टाकले असून यात सुमारे १ कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

लखनौतील प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजसह ४६ वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशावर सरकारने बंदी टाकली होती. सुविधांचा अभाव आणि नियमांची पूर्तता न केल्याने ही कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणात कुद्दुसी यांनी महाविद्यालयाला कायदेशीर मदत मिळवून दिली. तसेच सुप्रीम कोर्टात याप्रकरणात मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली, असा आरोप आहे.

सरकारच्या निर्णयाला इन्स्टिट्यूट चालवणारे बी पी यादव आणि पलाश यादव यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. बी पी यादव यांनी कुद्दूसी आणि भावना पांडेशी संपर्क साधला होता. मेरठमधील व्यंकटेश्वर मेडिकल कॉलेजच्या सुधीर गिरीच्या मार्फत त्यांनी कुद्दूसींशी संपर्क साधला. भुवनेश्वरच्या विश्वनाथ अग्रवालने याप्रकरणात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. सुप्रीम कोर्टात ‘वरिष्ठांशी चांगले संबंध’ असल्याचा दावा अग्रवालने केला होता.

बुधवारी सीबीआयने या प्रकरणात निवृत्त न्यायाधीश इशरत कुद्दूसी, विश्वनाथ अग्रवाल, बी पी यादव, पलाश यादव, हवाला ऑपरेटर राम देव सारस्वत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सीबीआयने दिल्ली, लखनौ, भुवनेश्वर येथे छापे टाकले होते. गुरुवारी सीबीआयने या सर्वांना अटक केली.