स्वच्छ भारत अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली सर्वात मोठी स्वच्छता मोहिम आहे. मात्र भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनाच स्वच्छ हा शब्द नीट लिहीताही आला नाही. ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’ असे बोर्डवर लिहून दाखवण्याची विनंती त्यांना एका कार्यक्रमात करण्यात आली. मात्र त्यानंतर मीनाक्षी लेखी यांनी जे काही लिहीले ते पाहून उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. इतकेच नाही तर त्यांना शेवटपर्यंत स्वच्छ हा शब्द लिहीताच आला नाही. त्यामुळे ट्विटरवर #MeenakshiLekhi या हॅशटॅगने त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले.

काहींनी तर लेखी यांची शैक्षणिक पात्रता तपासून बघा अशीही मागणी केली आहे. मीनाक्षी लेखी यांना इंद्रप्रस्थन गॅस लिमिटेडच्या स्वस्थ सारथी अभियान या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलावले होते. तिथे त्यांना हिंदी भाषेतून स्वच्छ भारत स्वस्थ भारत असे लिहीण्याची विनंती करण्यात आली. मात्र लेखी यांना हे स्वच्छ शब्द लिहीताच आला नाही.
कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी उघड्यावर लघुशंका केल्याचे फोटो आजच व्हायरल झाले होते. त्यात आता खासदार मीनाक्षी लेखी यांनी स्वच्छ शब्द लिहीताना चुका केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर प्रचंड टीका होताना दिसते आहे.