‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा अजब नियम घालण्यात आला आहे. या शाळेच्या संचालक मंडळावरील सचिवांच्या म्हणण्यानुसार ‘मुस्लिम मुले हिंदू नावे घेतात आणि हिंदू मुलींना ‘नादी लावतात’ आणि हा ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी शाळेनेच मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवले आहे.

विशेष म्हणजे आणखी एक विचित्र नियम लागू केला आहे. मुलांना दाढी ठेवायलाही या शाळेने बंदी घातल्याचं वृत्त आहे. त्या शाळेमध्ये गुरूवारी काही मुलांना वर्गात यायला बंदी घालण्यात आली आणि ‘हा मदरसा नाही’ असं सांगत या मुलांना दाढी काढून टाकण्याची तंबी देण्यात आली. या गोष्टी इथेच थांबत नाहीत तर शाळेतल्या सगळ्या मुलांना ‘योगी कट’ करून यायला सांगितलं आहे. योगी कट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हेअरस्टाईल होय. यानंतरही आपलं हुकूमशाही वागणं या शाळा प्रशासनाने सुरू ठेवलं आहे. मुलांनी त्यांच्या डब्यात मांसाहारी पदार्थ आणू नयेत, असं शाळेनं बजावलं आहे. शाळेच्या या हुकूमशाही पद्धतीमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत त्यांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर या शाळेने सारवासारव केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना योगी कट नाही तर सैन्यातील जवानांची हेअरकट ठेवा, असे सांगितल्याचे सचिवांनी सांगितलं आहे. पण विद्यार्थ्यांनी त्यांच्या डब्यात मांसाहारी पदार्थ आणू नयेत यावर शाळा ठाम आहे. ही शाळा जैन व्यवस्थापनाची असल्यामुळे आम्ही हा नियम लागू केल्याचं शाळेने म्हटलं आहे. मुलांच्या डब्यांची तपासणी केली जाईल, असेही शाळेनं म्हटलं आहे.