महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय मंत्रिगटाची बैठक पुढील आठवडय़ात येथे होणार आहे. राज्याला द्यावयाच्या आर्थिक साहाय्यावर या वेळी विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.
२०११-१२ मधील रब्बी तसेच २०१२ मधील खरीपहंगामावर दुष्काळाचे सावट होते. यंदाच्या हिवाळ्यातील रब्बी हंगामाला याच दिव्यातून जावे लागत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सध्या केंद्रातील आंतरमंत्रालयीन गट राज्याच्या दौऱ्यावर आहे. या गटाने नोंदवलेले निष्कर्ष पुढील आठवडय़ात होणाऱ्या उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.