मेघालयामध्ये पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यात झालेल्या एका अपघातामध्ये १६ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. वेस्ट खासी हिल्स या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नॉगस्टॉइन येथून ११ किमी दूर असलेल्या दोहक्रोह या ठिकाणी ही घटना घडली. घटनास्थळीच १२ जणांचा मृत्यू झाला. तर, रुग्णालयात दाखल केल्यानंतर चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ महिला आहेत. हे सर्व लोक प्रेस्बिटेरियन चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना त्यांचा अपघात झाला. या ट्रकमध्ये ७० जण होते.  सकाळी एका ट्रकमध्ये बसून हे सर्व लोक प्रार्थनेसाठी जात होते. त्यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर हा ट्रक गेला. त्यातून हा अपघात झाला.

हा ट्रक अतिवेगाने जात होता, चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर चढला. त्यामुळे, हे लोक मृत्युमुखी पडले असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. जखमींना शिलाँगच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या अपघाताची माहिती कळताच प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. रुग्णवाहिकेने जखमींना रुग्णालयालत नेण्यात आले. या घटनेमुळे या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. मेघालयचे आरोग्य मंत्री लिंगडोह यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.