काश्मीरमधील दहशतवादी कारवाया थांबल्यावर अफ्स्पा कायदा मागे घेण्यात येईल, असे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. राज्यातील दहशतवादी कारवाया संपल्यावरच हा कायदा मागे घेतला जाईल, असे मुफ्ती यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस दलाच्या एका कार्यक्रमात मेहबूबा मुफ्ती बोलत होत्या.

‘आपल्याला राज्यातून अफ्स्पा कायदा मागे घ्यायचा आहे. मात्र त्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. आपण हा कायदा मागे घेऊ शकतो. मात्र त्यासाठी दहशतवादी कारवाया थांबण्याची आवश्यकता आहे’, असे मुफ्तींनी म्हटले आहे. यावेळी काश्मीर खोऱ्यात आंदोलकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीवरदेखील मुफ्ती यांनी भाष्य केले. ‘दगडफेक करुन काश्मीर प्रश्न सुटणार नाही,’ असे मुफ्तींनी म्हटले आहे.

पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्तींनी पाकिस्तानवरही भाष्य केले आहे. ‘संवाद साधण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी पाकिस्तानने घुसखोरी बंद करावी,’ अशा शब्दांमध्ये मुफ्ती यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

‘दोन्ही देशांची सीमा एक असल्याने दोन्हीकडे शांतता नांदण्यासाठी संवाद साधला जाणे आवश्यक आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यायला हवे. दोन्ही देशांमधील संवाद सुरू होण्यासाठी घुसखोरी बंद व्हायला हवी,’ या शब्दांमध्ये मुफ्ती यांनी पाकिस्तानला खडसावले आहे.