भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असंयमी कृतीने काश्मीर खोऱ्यातील जनता होरपळली जाते, त्यामुळे दोन्ही राष्ट्रांनी संयम राखावा, असा सल्ला जम्मु-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी गुरुवारी दिला. भारतीय लष्कराने गुरुवारी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सहा ते सात दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती. या कारवाईनंतर मेहबुबा यांनी दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा असे म्हटले आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील  तणावपूर्ण परिस्थितीमुळे काश्मीरच्या नुकसानामध्ये आणखी भर पडेल, अशी प्रतिक्रिया मेहबुबा यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील जनता हिंसाचाराने हैराण असून त्यांना शांतता हवी आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थिती टाळून शांतीचा मार्ग स्विकारावा असे त्या म्हणाल्या. काश्मीर खोऱ्यातील जनतेसाठी दोन्ही राजकीय पक्ष सकारात्मक विचार करतील, असा विश्वासही मेहबुबा यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. भारताने सर्जिकल स्ट्राईक केले नसून फक्त गोळीबार केल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. परंतु या घटनेनंतर पाकिस्तानकडून काही लष्करी हालचाली झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सतर्क झाले आहे. पाकिस्तान सीमेरेषेपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील काही गावे रिकामी करण्यात आली असून येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे.

उरी लष्करी तळावर झालेला हल्ला हा काश्मीरमधील हिंसाचाराची परिस्थिती अधिक तीव्र करुन युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मेहबुबा यांनी यापूर्वी दिली होती.