काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनी चर्चेसाठी पुढे यावे आणि निष्पाप तरूणांचे जीव वाचवावेत, असे आवाहन काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले. काश्मीर खोऱ्यातील सद्यस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी शनिवारी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नवी दिल्लीतील ७ रेसकोर्स या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. या चर्चेनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमच्याइतकीच जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची चिंता आहे. यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांचे वडील काश्मीरचे दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सय्यद यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला दोन तृतीयांश इतके बहुमत मिळाले आहे. जर या काळात काश्मीरच्या परिस्थितीत फरक पडला नाही, तर कधीच पडणार नाही, असे मुफ्ती मोहम्मद सय्यद यांनी मेहबुबा मुफ्ती यांना सांगितले होते. यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराला चिथावणी देण्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केले. पाकिस्ताननेच काश्मीरमधील परिस्थिती बिघडवली असून, त्यांच्यामुळेच येथील वातावरण गढूळ झाल्याचे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले.जर पाकिस्तानला काश्मीरमधील तरूणांविषयी सहानुभूती असेल तर त्यांनी तरूणांना लष्कर आणि पोलीसांवर हल्ले करण्याची चिथावणी देऊ नये, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याचा भारतीय लष्कराने खात्मा केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता. त्यानंतर प्रथमच मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या हिंसाचारात आतापर्यंत ७० जण मारले गेले असून अद्यापही काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे.