पत्रकारांनी बोचरा प्रश्न विचारल्यामुळे चिडलेल्या काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतची पत्रकार परिषद गुरुवारी मध्येच संपवली. सध्याच्या संघर्षांदरम्यान मुफ्ती यांनी घेतलेल्या भूमिकेची तुलना २०१० सालच्या असंतोषाच्या वेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी करण्यात आल्यामुळे त्या चिडल्या.

२०१० साली नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व राजकीय प्रतिस्पर्धी ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री असताना फुटीरतावाद्यांना अटक करणे आणि त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर करणे याला मेहबूबा मुफ्ती यांनी विरोध दर्शवला होता याची एका वार्ताहराने आठवण करून दिली असता मेहबूबा त्याच्यावर चिडल्या. शेजारीच बसलेले राजनाथ सिंह त्यांना शांत राहण्यासाठी खुणा करत होते.

‘हे लोक मला काय सांगतील? यांच्या मुलांना मीच सुरक्षा दलांपासून वाचवले आहे,’ असे म्हणताना मुफ्ती यांचा संयम सुटल्याचे स्पष्ट दिसत होते. ‘धन्यवाद. आता तुम्ही चहा घेऊ शकता,’ असे अचानकपणे म्हणून मुफ्ती यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.

पत्रकारांनी केलेले विश्लेषण चुकीचे आहे. २०१० साली मचिल येथे बनावट चकमक घडून तीन नागरिक मारले गेले होते. त्यानंतर शोपियान येथे बलात्कार व खुनाचे आरोप झाले होते. या वेळी मात्र चकमक घडून तीन दहशतवादी मारले गेले. त्यासाठी सरकार कसे काय जबाबदार असू शकते, असा प्रश्न मुफ्ती यांनी विचारला.

लोक रस्त्यावर उतरल्यामुळे आम्ही संचारबंदी लागू केली. तरुण लष्कराच्या तळांवर टॉफीज विकत घेण्यासाठी गेले होते काय? दमहल हांजीपोरा येथील पोलीस ठाण्यावर हल्ला करणारा १५ वर्षांचा मुलगा तेथे दूध आणण्यासाठी गेला होता काय? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारले. दोन्ही घटनांची तुलना करू नका. त्या वेळी (२०१०) लोकांच्या मनात खरोखरच संताप होता, असे मेहबूबा म्हणाल्या.