ट्विटरवर जॉईन झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी पहिले ट्विट केले. त्यांच्या या ट्विटवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली. ट्विटरवरील आपले मौन तोडत पहिली पोस्ट केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी राज्याच्या पर्यटन विभागाचा एक प्रमोशनल व्हिडिओ अपलोड करुन पहिले ट्विट केले. त्या तीन वर्षांपूर्वीच ट्विटरवर जॉईन झाल्या आहेत. मात्र, त्यांनी आज पहिल्यांदाच यावर पोस्ट टाकली. मेहबूबा यांच्या या ट्विटला उत्तर देताना ओमर म्हणाले, २५००० फॉलोवर्स असणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांनी अखेर ट्विटरवर पर्यटन विभागाचा प्रमोशनल व्हिडिओ टाकत मौन तोडले आहे. ट्विटरवर आपले स्वागत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुफ्ती यांनी अपलोड केलेला हा पाच मिनिटांचा लघुपट अनेक लोकांनी पाहिला आहे. ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत तब्बल १.६ मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

विरोधी पक्षनेते असलेले ओमर यांनी रविवारी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावर काश्मीरच्या परिस्थितीवरुन टीका केली होती. येथील परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे मेहबूबा यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ लोक मारले गेले होते. त्यावर मेहबूबा यांनी माध्यमांवर खापर फोडत माध्यमांचा खोऱ्यातील परिस्थितीबाबत नकारात्मक दृष्टीकोन असल्याचा आरोप केला होता.