हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हान वानी काश्मिरातील चकमकीच्या ठिकाणी हजर असल्याची सुरक्षा दलांना माहिती होती, असे सांगून भाजपने शनिवारी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा या संदर्भातील दावा खोडून काढला.

डोक्यावर १० लाखांचे इनाम असलेल्या बुऱ्हान वानीला ठार करणे सुरक्षा दलांचे यश असून, अशा मोहिमांमध्ये दहशतवाद्यांची ओळख हा महत्त्वाचा मुद्दा नसतो, असे जम्मू-काश्मीरचे भाजप प्रदेशाध्यक्ष सत शर्मा म्हणाले. जिथवर वानी याला ठार करण्याता घटनाक्रमाचा संबंध आहे, सुरक्षा दलाला त्याच्याबाबत नक्कीच कल्पना होती. आत कोण लपले आहे हे त्यांना माहीत होते आणि प्रत्येक बाबीचा विचार केल्यानंतरच त्यांनी त्यांचे काम सुरू केले. ‘माहिती असल्याशिवाय’ सुरक्षा दले काम करत नाहीत, असे शर्मा यांनी सांगितले.

देशाचे विघटन करण्यासाठी जे लोक बंदूक हातात घेतात आणि जम्मू- काश्मीर हा भारताचा भाग असल्याचे मानत नाहीत ते दहशतवादी आहेत आणि मारले जाण्याच्या लायकीचेच आहेत असे सांगून शर्मा म्हणाले की, देश तोडू इच्छिणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांनी ज्यारीतीने काम केले, ती वाखाणण्याजोगी आहे.

सुरक्षा दलांनी ८ जुलै रोजी दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग येथील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणावर छापा घातला, तेव्हा तिथे बुऱ्हान वानी असल्याची सुरक्षा दलांना कल्पना नव्हती, असे मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी म्हटले होते.