केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीस इसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
अर्शी कुरेशी असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. बुधवारी रात्री उशिरा कारवाई करत पोलिसांनी या व्यक्तीला अटक केल्याचे समजते.
बुधवारी रात्री उशीरा नवी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर गुन्ह्यांमध्ये या व्यक्तीचा समावेश असल्याने केरळ पोलिसांनी गेल्याच आठवड्यात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता.
केरळमधल्या मरिअम नावाच्या महिलेला जबरदस्ती इसिसमध्ये भरती करण्याचा आरोप कुरेशी आणि पीडित महिलेच्या पतीवर आहे. मरिअम हिने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता त्यानंतर तिच्या पतीकडून आणिअर्शी कुरेशीकडून तिला इसिसमध्ये भरती होण्याची जबरदस्ती केली जात होती, असे या महिलेच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद पथक आणि केरळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अर्शी कुरेशी याच्या नवी मुंबई येथील घरावर छापे टाकले आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास केरळ पोलीस करत आहेत.
वाचा : दहशतवादाला कधीच पाठिंबा दिला नाही- झाकीर नाईक
केरळमधून बेपत्ता असलेल्या २१ जणांपैकी मरिअम ही एक आहे.­­­ हे २१ जण इसिसमध्ये भरती झाल्याची दाट शंका पोलिसांना आहे. सूत्राच्या माहितीनुसार बेपत्ता असलेली मरिअम एका कॉल सेंटरमध्ये कामाला होती आणि गेल्याच वर्षी नवी मुंबई येथे स्थायिक झाली होती. मरिअमचा भाऊ जेकोब यांनी कुरेशीने आपल्याला देखील इसिसमध्ये भरती होण्यासाठी जबरदस्ती केल्याचे सांगितले तसेच कुरेशी यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्याशी देखील आपली भेट घालून दिल्याचा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून झाकीर नाईक हे माध्यमात चांगलेच चर्चेत आहेत. ढाका मधल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी नाईक यांच्या भाषणापासून प्रेरणा घेत हल्ला केला असा त्यांच्यावर आरोप होता. त्यांच्या एकूणच भाषणाची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. बुधवारी रात्री अटक केला अर्शी कुरेशी हा नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनमध्ये काम करत असल्याच्या वृत्ताला येथील प्रवक्त्यांनी देखील दुजोरा दिला आहे.