बरीच चर्चा झालेली जनता परिवाराची एकजूट आता पुढील आठवडय़ात होत असून जनता परिवाराच्या एकीतील अनेक मतभेद दूर झाले आहेत, असे जनता दल संयुक्तने सांगितले आहे.
जनता दल संयुक्तचे नेते शरद यादव यांनी सांगितले की, जनता परिवाराचे आज ना उद्या एकीकरण होणार असून मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाचे जास्त खासदार असल्याने जनता परिवाराचे नेतृत्व मुलायम करतील, म्हणजेच ते या आघाडीचे अध्यक्ष असतील असे सांगण्यात आले.
लोकसभेत समाजवादी पक्षाचे पाच सदस्य असून राजदचे चार, जनता दल युनायटेड, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भारतीय राष्ट्रीय लोकदल यांचा प्रत्येकी एक खासदार आहे. जनता दलाचे सरचिटणीस के.सी.त्यागी यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव हे जनता परिवाराच्या एकीकरणाचे काम करतील व ते एक दोन दिवसात भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौताला व माजी पंतप्रधान व जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांची भेट
घेतील.
जनता परिवाराच्या एकीकरणाची घोषणा बहुदा सोमवारी केली जाणार असून मुलायमसिंह हे सर्व घटक पक्षांची बैठक घेतील. पक्षाच्या ध्वजाबाबत, जाहीरनाम्याबाबत व चिन्हाबाबत मतभेद नाहीत. सर्व मतभेद दूर झाले आहेत असा दावा त्यागी यांनी केला. या वेळी बैठकीस राजद नेते प्रेमाचंद गुप्ता व के .सी.त्यागी उपस्थित होते.