रशियातील उरल पर्वतराजीजवळच्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी आभाळातील भयचमत्कार अनुभवला . या भागात आगीचा प्रचंड लोळ उडविणारी उल्का कोसळली. ताशी ५४ हजार कि.मी वेगाने आदळलेल्या या उल्केमुळे अनेक स्फोट झाले. साडेतीन हजारांहून अधिक इमारतींना तडे गेले. त्यात ९०० जण जखमी झाले. त्यांच्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या उल्केचे तुकडे अतिशय विरळ लोकसंख्या असलेल्या या भागात पडले. यापूर्वी सायबेरियात तुंगस्का भागात उल्का कोसळून १९०८ मध्ये ८२० चौरस मैल परिसराला फटका बसला त्यात ८ कोटी झाडे जमीनदोस्त झाली होती.
उल्कावर्षांव की शस्त्रचाचणी?
तो उल्कावर्षांव होता असे अंतर्गत आपत्कालीन कामकाजमंत्री इरिना रोसियस यांचे म्हणणे आहे, तर दुसऱ्या एका मंत्रालय प्रवक्तीने सांगितले, की ती एकच उल्का होती. रशियातील नॅशनॅलिस्ट पक्षाचे नेते व्लादिमीर झिरकोवस्की यांच्या मते ही उल्का वगैरे नव्हती ती अमेरिकेने केलेली नव्या शस्त्रास्त्राची चाचणी होती.
हानी किती व कशी?
या उल्केच्या आघाताने घरांच्या काचा फुटल्या, एका जस्त कारखान्याचे ६०० चौरस मीटरचे छप्पर कोसळले. ही घटना घडली तेव्हा आकाश स्वच्छ होते तरीही नेमके काय घडले याबाबत परस्परविरोधी बातम्या  फिरत होत्या.
लघुग्रहाची भीती कशी?
लघुग्रह २०१२ डीए १४ हा पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार असल्याच्या एक दिवस अगोदर उल्का कोसळली आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून २८ हजार किमी अंतरावरून जाणार होता. या दोन्ही घटनांचा नेमका काही संबंध आहे किंवा काय यावर प्रकाश पडलेला नाही.