पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांनी गुरूवारी त्यांच्या पाच दिवसीय विदेश दौऱ्याचा अखेरचा टप्पा असलेल्या मेक्सिकोला भेट दिली. याठिकाणी पोहचल्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रिक पेना नीटो हे मोदींची विशेष बडदास्त ठेवताना दिसले. नीटो यांनी सर्व राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवत मोदींना स्वत: गाडी चालवत मेक्सिकोतील शाकाहारी रेस्टाँरंटमध्ये नेले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नीटोंच्या या खास आदरातिथ्याची छायाचित्रे ट्विट केली आहेत. यामध्ये पंतप्रधान नीटो गाडी चालवत असून मोदी त्यांच्या बाजूला बसलेले दिसत आहेत. गाडीतून हे दोघेजण ‘क्विंटोनील’ या रेस्टॉरंटमध्ये दाखल झाले आणि त्याठिकाणी त्यांनी भोजनाचा आनंद घेतला. छायाचित्रांमध्ये जेवणाच्या टेबलवर मोदी आणि नीटो एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. ही छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहेत. मेक्सिकोने आण्विक पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्यासाठी मोदींनी नीटो यांचे आभार मानले आहेत. नीटो यांनीदेखील पंतप्रधान मोदींची भेट दोन्ही देशांसाठी उपयुक्त आणि आनंददायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, या छोटेखानी भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दिशेने प्रयाण केले आहे. या भेटीनंतर मोदींनी मेक्सिकोचे ट्विटरवरून आभार मानले. धन्यवाद मेक्सिको. भारत आणि मेक्सिकोतील संबंधांचा नवा कालखंड सुरू झाला आहे. हा कालखंड दोन्ही देशांबरोबरच संपूर्ण जगासाठी फायदेशीर, अशा आशयाचे ट्विट मोदींनी मेक्सिकोतून केले आहे. मोदींचा पाच दिवसीय दौऱ्याला ४ जुनपासून अफगाणिस्तामधून सुरूवात झाली होती. त्यानंतर कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका असा प्रवास करत ते आज पहाटे मेक्सिकोमध्ये येऊन पोहचले होते.