२०१४ साली बेपत्ता झालेल्या एमएच ३७० या विमानाचे अवशेषाचे शोध घेण्याचे कार्य थांबविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल पावणे तीन वर्षांपेक्षा अधिक  काळ ही मोहीम चालली.  हिंद महासागरातील १,२०,००० चौ. किमी. या क्षेत्रफळात विमानाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू होते.  इतका शोध घेऊनही  या विमानाचे २० पैकी केवळ ७ भागच मिळाले. हा शोध थांबविण्याचा निर्णय मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या सरकारने संयुक्तरित्या घेतला आहे.

आज या मोहिमेचा शेवटचा भाग होता असे या प्रसिद्धिपत्रकात सांगितले आहे. आम्ही हा निर्णय जड अंतःकरणाने घेत आहोत असे या संयुक्त प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. आमच्या जवळ असणाऱ्या प्रत्येक सोयीसुविधेचा वापर करुन आम्ही एमएच ३७० चा शोध घेत होतो. सर्व प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान आमच्या हाताशी होते तसेच या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ आमच्यासोबत काम करीत होते असे असून देखील आम्हाला हे अवशेष सापडले नाहीत असे ते म्हणाले.

८ मार्च रोजी क्वालालंपूर येथून उड्डाण घेतलेले एमएमच ३७० हे विमान बिजींगला निघालेले होते. थोड्याच वेळात या विमानाचा संपर्क तुटला आणि हे विमान रडारावरही दिसेनासे झाले. या विमानावर एकूण २३९ जण होते. या मोहिमेसाठी १८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा खर्च झाला.

शोधकर्त्यांनी विमान आणि जहाजांच्या साहाय्याने व्यापक शोध घेऊनही या विमानाचा काहीही मागमूस लागलेला नाही. ऑस्ट्रेलियाने उपलब्ध करून दिलेल्या चार जहाजांवरील पाणबुड्यांनी नजीकच्या भूभागापासून हिंदी महासागराच्या किमान १,२०,००० चौ. किमी इतक्या मोठ्या क्षेत्रात समुद्रात खोलवर जाऊन विमानाच्या अवशेषांचा शोध घेतला. यापूर्वी हे काम केवळ सॅटेलाइटच्या साहाय्याने करण्यात येत असे. आम्ही जेवढ्या आकाराच्या क्षेत्रफळात शोध घेतला, तो ‘न भूतो न भविष्यती’ असा आहे, असे ऑस्ट्रेलियन वाहतूक सुरक्षितता ब्युरोच्या प्रमुखांनी सांगितले होते.

इतका शोध घेऊनही शेवटी हाती काहीच लागत नसल्याचे पाहून या तिन्ही देशांनी हा शोध थांबवला आहे. त्यांनी याबाबत विमानावर असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना कळवले असल्याचे म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयावर व्हॉइस ३७० या समूहाने नाराजी व्यक्त केली आहे. व्हॉइस ३७० हा या विमानातील प्रवाशांच्या नातेवाइकांचा एक समूह आहे. एखादे व्यावसायिक विमान हे बेपत्ता होत असेल तर त्याचा शोध घ्यायला हवा असे ते म्हणाले.