युक्रेनमध्ये दोन वर्षांपूर्वी कोसळलेले मलेशियन एअरलाईन्सचे विमान हे रशियन मिसाईलव्दारे पाडल्याचे निष्पन्न झाले आहे. यामागे रशियन बंडखोरांचा हात असल्याचेही समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आले आहे.
जुलै २०१४ मध्ये मलेशियन एअरलाईन्सचे क्वालालांपूरहून अॅमस्टरडॅमला निघालेले विमान युक्रेनच्या हद्दीत संशयास्पदरित्या कोसळले होते. या दुर्घटनेत २९८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, मलेशिया आणि युक्रेन या देशांची संयुक्त तपास समिती नेमण्यात आली होती. या समितीने कॉल रेकॉर्ड, सोशल मीडियावरील माहिती, प्रत्यक्ष साक्षीदार आणि अन्य पुरावांच्या आधारे आपला अहवाल तयार केला आहे. या अहवालात विमान पाडण्यासाठी मिसाईल देण्यामागे रशियाचा हात असल्याचे म्हटले आहे. यात कोणत्याही एका व्यक्तीचे नाव घेण्यात आले नाही. रशियन सैन्यातील जवान या घटनेत सहभागी असल्याचे अहवालात म्हटले आहे. जमिनीवरुन हवेत मारा करणा-या शक्तीशाली रशियन मिसाईलच्या आधारे हे विमान पाडण्यात आले होते. हे मिसाईल रशियन समर्थक बंडखोरांना देण्यासाठी रशिया सरकारने मदत केल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. बक किंवा एसए ११ या मिसाईलचा विमान पाडण्यात उपयोग केला अशावा असे यात म्हटले आहे.
नेदरलँडच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या समितीच्या अहवालावर रशियाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शक्यता, अविश्वासार्ह माहितीच्या आधारे हा अहवाल तयार गेला आहे अशी प्रतिक्रिया रशियाने दिली आहे. रशियाने सोमवारी घटनेच्या दिवशीचे रडारचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये विमानाच्या जवळ कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नव्हती. जर विमान मिसाईलने पाडले असेल तर ते मिसाईल दुस-या देशाच्या हद्दीतून डागण्यात आले असावे असा दावा रशियाने केला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी रशियाने जाहीर केलेले रडारचे छायाचित्र यापेक्षा वेगळे होते. यामध्ये दोन टिंब होते. यात एक मलेशियन एअरलाईन्सचे विमान आणि दुसरे युक्रेनचे लढाऊ विमान होते असा दावा रशियाने केला होता. त्यामुळे आता रशियाने दोन वेगवेगळे दावे करणारे पुरावे सादर केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. युक्रेनमध्ये बंडखोर आणि युक्रेन सैन्यात रक्तरंजित संघर्ष सुरु असताना हे विमान पाडण्यात आले होते. या घटनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले होते. विमानातील बहुसंख्य प्रवासी नेदरलँडचे होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने या घटनेप्रकरणी दिलेल्या अहवालातही रशियन बनावटीच्या मिसाईलने विमान पाडण्यात आले. मिसाईल विमानावर सोडण्यासाठी बंडखोराच्या जागेचा वापर करण्यात आला असे म्हटले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा या घटनेवरुन रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणावाचे संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे.