गेल्या ८ मार्चला बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचा शोध घेण्याबाबत तज्ज्ञ अजूनही आशावादी असून आतापर्यंत मिळालेल्या संदेशांच्या काही किलोमीटर क्षेत्रातच ब्लॅकबॉक्स असावा, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आता शोधक्षेत्र कमी झाले असून काही पिंग संदेशांमुळे ते आणखी कमी होत चालले आहे. जिथून ब्लॅक बॉक्सचा संदेश क्षीण होत जातो त्या अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. संदेश संपायच्या आधी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा आमचा उद्देश आहे, असे त्यांनी पूर्व शांघाय शहरात पत्रकारांना सांगितले.
बेपत्ता विमानात २३९ प्रवासी होते व त्यात पाच भारतीयांचा समावेश होता. ब्लॅक बॉक्सचा ठावठिकाणा सापडेल, पण ब्लॅकबॉक्स जिथे आहे तिथेच साडेचार किलोमीटर खोलीवरून विमानाचे अवशेष बाहेर काढणे अवघड असेल. आपण याबाबत जास्त माहिती देणार नाही, पण अध्यक्ष शी जिंगपिंग यांना व्यक्तिगत भेटून माहिती देणार आहोत. आप्तेष्ट गमावलेल्या चिनी लोकांच्या नातेवाईकांचे अबॉट यांनी सांत्वन केले. ऑस्ट्रेलियाच्या नौदलाला त्याच भागात पाण्याखालून संदेश मिळाला होता.
दरम्यान, विमान शोध समन्वय केंद्राचे प्रमुख हॉस्टन यांनी सांगितले की,ते संदेश ब्लॅक बॉक्सशी निगडित नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या ‘ओशनफील्ड’ या जहाजाला हे संदेश मिळाले होते. यात पाचवा संदेश अलीकडेच सापडला होता. ‘ओशनफील्ड’ या जहाजाला शनिवारी सापडलेले संदेश हे ब्लॅकबॉक्सशी निगडित होते, तर मंगळवारी अजून दोन संदेश सापडले आहेत.
येत्या काही दिवसात पाण्याखालून जाणारे वाहन सोडण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आजच्या शोध मोहिमेत १२ लष्करी विमाने व १३ जहाजे सहभागी होती. हिंदी महासागरात शोध मोहीम सुरू झाल्यापासून ऑस्ट्रेलिया त्याचे नेतृत्व करीत आहे.