डेमोकट्रिक पक्षाच्या मेळाव्यात मिशेल ओबामा यांचे अमेरिकी मतदारांना आवाहन

‘मी माझ्या दोन मुलींना व्हाइट हाऊसच्या हिरवळीवर खेळताना पाहते आणि माझ्या मनात विचार येतात की, या आणि अशा लाखो अमेरिकी तरुणांचे भवितव्य येत्या चार ते आठ वर्षांत प्रभावीपणे घडवू शकेल अशी एकच व्यक्ती आपल्यासमोर आहे, ती म्हणजे हिलरी क्लिंटन. आगामी अध्यक्षाच्या रूपात नारीशक्ती काय घडवू शकते याची झलक हिलरी यांच्या व्यक्तिमत्त्वातून झळकते. येत्या नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आपण मतदान करू तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला रिपब्लिकन किंवा डेमोकॅट्र, डावा किंवा उजवा यातून निवड करायची नसून जी व्यक्ती आपल्या मुलांचे भवितव्य घडवू शकेल अशी व्यक्ती निवडायची आहे,’ असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांनी माजी परराष्ट्रमंत्री आणि आपली मैत्रीण हिलरी क्लिंटन यांच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीला डेमोकॅट्रिक पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करताना पाठिंबा व्यक्त केला.

अमेरिकी तरुणांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी पेलण्यास आणि अध्यक्ष बनण्यास हिलरी क्लिंटन याच योग्य उमेदवार आहेत असे मिशेल म्हणाल्या.

विरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना     मिशेल म्हणाल्या, आपण दाखवून दिले पाहिजे की या व्यक्ती जी द्वेषाची भाषा वापरतात ती अमेरिकेच्या राष्ट्रीय परंपरेशी आणि मूल्यांशी सुसंगत नाही. जेव्हा तुमच्या हाती देशाच्या भविष्याची सूत्रे येणार आहेत, अण्वस्त्रे डागण्याची सांकेतिक आज्ञावली तुमच्या हाताशी असते आणि देशाच्या संपूर्ण लष्कराचे तुम्ही सर्वोच्च नेते असता तेव्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी एका सुजाण, समजूतदार आणि संयमी व्यक्तीची गरज असते. आततायीपणाने निर्णय घेणाऱ्या आणि प्रत्येक विषय ट्विटरवर १४० शब्दांत मांडणाऱ्या व्यक्तीचा उपयोग नसतो.