आपले राहते घर सोडून जाणे हा क्षण सर्वांसाठीच कठीण असतो. ज्या घरात आनंदाचे क्षण साजरे केले, अवघड काळात एकमेकांना साथ दिली, त्या घराचा निरोप घेताना प्रत्येकजण हळवा होतो. बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार होत असल्याने तब्बल ८ आठ वर्षे जगातील सर्वाधिक शक्तीशाली कुटुंब राहिलेल्या ओबामा कुटुंबियांवर हीच वेळ आली आहे. बराक ओबामा यांच्या अध्यक्ष पदाचा कालावधी संपत असल्याने बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसला निरोप देण्याची तयारी केली आहे. व्हाईट हाऊसमधील अखेरचे काही क्षण मिशेल ओबामा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊसमधील बराक ओबामा यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत बराक आणि मिशेल ओबामा व्हाईट हाऊसमधून बाहेर पाहत आहेत. या फोटोसोबतच मिशेल ओबामा यांनी बराक ओबामा यांच्यासाठी एक संदेशदेखील लिहिला आहे. ‘तुमची पत्नी असणे, हा माझ्यासाठी आयुष्यभर सन्मान असेल. ह्रदयापासून धन्यवाद,’ अशा शब्दांमध्ये मिशेल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BPajTp8BCDZ/

 

यासोबतच व्हाईट हाऊसचा निरोप घेत असतानाच एक व्हिडिओदेखील मिशेल ओबामा यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मिशेल एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या घरात अखेरचा फेरफटका मारताना दिसत आहेत. यामध्ये ओबामा कुटुंबाच्या कुत्र्याने मिशेल यांना सोबत केली आहे. ज्या घरात आठ वर्षे वास्तव्य केले, त्या घराचा निरोप घ्यावा लागत असल्याचे दु:ख मिशेल यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसून येते आहे. ‘व्हाईट हाऊसमधील अखेरचा फेरफटका’ या शब्दांमध्ये मिशेल ओबामा यांनी या व्हिडिओचे वर्णन केले आहे. मिशेल ओबामा यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ३२ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओवर ३० हजारपेक्षा अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.