भारतीय हवाई दलाचे बिसन मिग-२१ जातीचे विमान शनिवारी नलिया हवाई तळाजवळ कोसळले. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान कोसळण्यापूर्वीच वैमानिकाने बाहेर उडी घेतल्याने तोही या दुर्घटनेतून बचावला. या विमानाची नियमित चाचणी घेतली जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमान कोसळताना त्यामध्ये आग लागली नव्हती, असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी आणि वनाधिकारी अतुल दवे यांनी सांगितले.जखमी वैमानिकाला भुजच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात मिग-१७ जातीच्या दोन विमानांची हवेतच टक्कर झाली होती आणि त्यामध्ये पाच अधिकाऱ्यांसह भारतीय हवाई दलाचे नऊ कर्मचारी ठार झाले होते.