पाकिस्तानच्या वायव्य भागात संशयित अतिरेक्यांनी पोलिओ लसीकरण पथकावर केलेल्या हल्ल्यात या पथकाच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खैबर-पख्तुनवा प्रांतातील स्वाबी जिल्ह्य़ात काला विभागात मोटारसायकलवरून आलेल्या अतिरेक्यांनी दोन महिला आरोग्य अधिकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये मुनसीफ खान हा पोलीस जागीच ठार झाला. तथापि दोन कर्मचारी सुदैवाने बचावले.
या घटनेची खबर मिळताच अतिरिक्त तुकडय़ांनी या विभागाला वेढा घातला असून, शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तालिबान्यांचा लसीकरण मोहिमेला पहिल्यापासूनच विरोध आहे.
या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांना लसीकरण मोहिमेतून आपल्या कर्मचाऱ्यांना माघारी बोलवावे लागले आहे, असे सूत्रांनी सांगितले.