काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी ठार
काश्मीरमध्ये अवघ्या चोवीस तासांच्या आतच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर चढवलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी मारले गेले. सुमारे दोन आठवडय़ांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या पोटनिवडणूक लढवणार असलेल्या अनंतनाग येथे हा हल्ला झाला आहे.
सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य बनवून केलेल्या या हल्ल्यात संशयित दहशतवाद्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास अनंतनाग शहरातील मुख्य बसस्थानकावर एका पोलीस पथकावर गोळीबार केला. यात जबर जखमी झालेले सहायक उपनिरीक्षक बशीर अहमद व शिपाई रियाझ अहमद हे दोघे नंतर रुग्णालयात मरण पावले.
बंदी घातलेल्या हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी बिजबेहरा येथे सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर केलेल्या छुप्या हल्ल्यात बीएसएफचे तीन कर्मचारी मारले गेले होते. या हल्ल्याला २४ तास उलटण्याच्या आतच शनिवारचा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांनी या भागाला वेढा घातला असून, हल्लेखोरांना शोधण्यासाठी ते ठिकठिकाणी छापे घालत आहेत.
अनंतनागमधील हा हल्ला म्हणजे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या येथून निवडणूक लढवणार असल्याने मतदारांना घाबरवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. माजी मुख्यमंत्री व मेहबूबा यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात २२ जूनला पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ९ उमेदवारांमध्ये मेहबूबांचाही समावेश आहे.
पीडीपी-भाजप सरकार कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या विरोधी पक्षांनी केली आहे. मतदारांच्या मनात दहशत निर्माण करण्यात येत असून हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शनिवारच्या हल्ल्यात दोन पोलिसांना ठार मारल्यानंतर हातात बंदुका घेतलेले दहशतवादी रस्त्यावरून जात असल्याची छायाचित्रे ऑनलाइन झळकली आहेत.