तामिळनाडूमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार राज्यातील २२ लाख नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी परदेशात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या तामिळनाडूमधील बहुतांश घरांमध्ये अनेक गृहिणींना एकट्यानेच मुलांचा सांभाळ करावा लागत आहे. याशिवाय, अनेक वृद्ध पालकांना मुलांशिवाय एकट्यानेच दिवस काढावे लागत आहेत. मात्र, या स्थलांतरितांकडून त्यांच्या घरी पाठविण्यात येणाऱ्या पैशांचा तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय वाटा आहे. वर्षाकाठी ही रक्कम ६१, ८४३ कोटी रूपयांच्या घरात जाते. हे प्रमाण तामिळनाडू राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १४ टक्के इतके आहे. याशिवाय, २०१४-१५ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून तामिळनाडूला देण्यात आलेल्या महसूली वाट्याचा आणि राज्याच्या एकूण खर्चाचा विचार करायचा झाल्यास हे प्रमाण अनुक्रमे ६.८ टक्के आणि १.८ टक्के इतकी आहे.

थिरूवनंतपुरम येथील सेंटर फॉर कॉम्प्रिहेन्सिव स्टडीज (सीडीएस) या संस्थेकडून राज्यातील स्थलांतरितांच्या अभ्यासासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणातील माहितीचा ढोबळमानाने विचार करायचा झाल्यास तामिळनाडूतील प्रत्येक १० कुटुंबांपैकी एका कुटुंबातील एक किंवा एकापेक्षा जास्त सदस्य नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. राज्यातील एकूण २२ लाख स्थलांतरित लोकसंख्येत ७५ टक्के हिंदू, १५ टक्के मुस्लिम आणि १० टक्के ख्रिश्चनांचा समावेश आहे. याशिवाय, स्थलांतरितांमध्ये १५ टक्के महिलांचाही समावेश आहे.

तामिळनाडूतील स्थलांतरितांचा सर्वाधिक टक्का सिंगापूरमध्ये आहे. सर्वेक्षणानुसार सिंगापूरमध्ये ४.१ लाख तामिळी नागरिक आहेत. तर, अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत , ओमान आणि कतार या आखाती देशांमध्ये असणाऱ्या १.१ लाख स्थलांतरितांपैकी निम्मा टक्का हा तामिळी नागरिकांचा आहे. तामिळनाडूच्या तब्बल ८५ टक्के स्थलांतरित पश्चिम आशिया आणि आग्नेय आशिया या दोन्ही ठिकाणी विखुरले आहेत. त्यामुळे केरळच्या तुलनेत आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्यास तामिळनाडूला त्या तुलनेत कमी झळ पोहचते. केरळमधील ८६ टक्के स्थलांतरित हे आखाती देशांमध्येच स्थायिक असल्याने त्यांना या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेतील बदलांचा परिणाम जास्त सहन करावा लागतो.

दरम्यान, या नागरिकांच्या या स्थलांतराचा तामिळनाडूतील सामाजिक जीवनावर लक्षणीय परिणाम झाला आहे. राज्यातील तब्बल २० लाख लहान मुलांना आपल्या पालकांपासून बराच काळ दूर राहावे लागते. तर १० लाख विवाहित स्त्रियांना पतीपासून लांब राहावे लागते. याशिवाय, २० लाख वृद्ध पालक आपल्या मुलांशिवायच दिवस कंठत आहेत. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी या सगळ्यांना आपल्या आप्तेष्टांचा विरह सहन करावे लागणे अपरिहार्य असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.