मेघालयात  एका १० वर्षीय मुलीवर सात अल्पवयीन मुलांना बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मेघालयामधील खासी जिल्ह्यातील मॉटन या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मेघालयामध्ये एकाच महिन्यातील हा पाचवा सामूहिक बलात्कार आहे. या बलात्कारातील सर्व संशयित हे १४ ते १६ या वयोगटातील आहे. पीडितेवर एका महिन्याच्या काळातच  त्याच संशयितांकडून दोनदा बलात्कार करण्यात आला. नाताळाच्या आधी एकदा आणि १३ जानेवारी रोजी दुसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ती एकटी असल्याचे पाहून गावातील शेतामध्येच तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मागील वर्षी मेघालयामध्ये एकूण १०१ बलात्कार झाले त्यापैकी २२ बलात्कार हे लहान मुलींवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

[jwplayer 9WJfwJpn]

सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या ३७६ कलमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेनंतर मुलीला मानसिक आघात झाला होता. आता तिची स्थिती सुधारत चालली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व संशयितांनी आपला गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. तिला समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी सांगितले. अलीकडील काही काळात मेघालयात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत चालल्याची दिसून येत आहे.

त्यामुळे या भागातील महिलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी अपक्ष आमदार ज्युलियस किटबॉक दोर्फांगला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १०-१२ जणांना अटक करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली होती. तर त्याच दिवशी दुसऱ्या एका घटनेत १३ वर्षीय मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला होता. २००१ मध्ये एका वर्षभरात २६ बलात्कारांचे गुन्हे नोंदवले गेले होते. आता ते प्रमाण खूप पटीने वाढले असून २०१३ या वर्षभरात १८३ बलात्काराचे गुन्हे मेघालयात नोंदवले गेले आहेत.

[jwplayer kfZKFPy2]