काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. अन्यायाविरोधात उठणारा आवाज सध्या दाबून टाकण्यात येत असून अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.
ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांना मरणोत्तर जी. के. रेड्डी स्मृती पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गांधी बोलत होत्या. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग या वेळी उपस्थित होते.
सध्याच्या वातावरणात अन्यायाविरोधातील आवाज दाबून टाकला जात आहे, अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे, समाजाच्या धर्मनिरपेक्ष रचनेला धोका निर्माण झाला आहे, अशा स्थितीत आपल्याला विनोद मेहता यांच्या कार्याची उणीव भासत आहे, असे सोनिया म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांचे सरकार म्हणजे काही जणांचे सरकार असून ते एक व्यक्ती निवडक व्यक्तींसाठी चालवत असणारे सरकार आहे, असा हल्लाही सोनियांनी चढविला.  सुवर्णपदक, पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.