दोन्ही वैमानिक बेपत्ताच

भारतीय हवाई दलाचे आसाममधील तेजपूर येथून दोन वैमानिकांसह बेपत्ता झालेले सुखोई हे लढाऊ जेट विमान आसाम-अरुणाचल सीमेवर सापडले आहे ते २३ मे रोजी बेपत्ता झाले होते. खराब हवामानामुळे विमानाचा शोध घेण्यात अनेक अडचणी आल्या असून दोन वैमानिकांबाबत अजून काही समजलेले नाही, असे लेफ्टनंट कर्नल सोंबित घोष यांनी सांगितले.

या विमानाचा संपर्क ज्या ठिकाणी असताना तुटला होता तेथेच म्हणजे तेजपूरच्या उत्तरेला ६० कि.मी. अंतरावर ते सापडले आहे. सुखोई ३० एमकेआय जेट विमान आसाममध्ये तेजपूरच्या उत्तरेला  ६० कि.मी. अंतरावर चीन सीमेजनीक बेपत्ता झाले होते. सुखोई विमान स्क्वार्डन लिडर चालवत होते व समवेत फ्लाइट लेफ्टनंटही होता. २३ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता या विमानाने नेहमीप्रमाणे सरावासाठी उड्डाण केले.

भारतीय हवाई दलाने आतापर्यंत २४० पकी ७ सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमाने अशा दुर्घटनात गमावली आहेत. भारताने दोन आसनी २७२ सुखोई विमाने रशियाकडून १२ अब्ज डॉलर्सला घेतली होती व त्यांचे उत्पादन रशियाच्या परवानगीने हिंदुस्थान अरोनॉटिक्स येथे करण्यात आले होते. २०११ पासून लष्कराने एकूण साठ विमाने व हेलिकॉप्टर्स गमावली असून त्यात ८० जण मरण पावले आहेत.

गेल्या वर्षी आसाममध्ये नागाव येथे सुखोई ३० एमकेआय विमान नेहमीच्या सराव उड्डाणात कोसळले होते त्यावेळी दोन वैमानिक सुखरूप बचावले होते, त्यावेळी काही स्थानिक लोक जखमी झाले होते.

चौकशीचे आदेश

सुखोई विमान पडून झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश भारतीय हवाई दलाने दिले आहेत. हवाईदलाचे प्रवक्ते विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले की, या अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे विमान पडले तो दुर्गम भाग असून विमानाचा सांगाडा दिसला असला तरी तो आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक पथक तेथे गेल्यानंतर फ्लाइट डाटा रेकॉर्डर व दोन बेपत्ता वैमानिकांचा शोध घेतला जाईल. ट्रेकिंगच्या माध्यमातून लष्कराचे पथक तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे, पण खराब हवामानामुळे त्यात अडथळे येत असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.