सॅमसंग सर्वोच्च स्थानावर तर अ‍ॅपलचे खरेदीदार घटले; पहिल्या पाच मध्ये चिनी कंपन्यांना स्थान

चालु आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीच्या कालावधीत जगभरात ३४ कोटी ४३ लाख ५९ हजार ७०० मोबाइलची विक्री झाली आहे. गतवर्षी या कालावधीत झालेल्या मोबाइल विक्रीच्या तुलनेत ही विक्री ४.३ टक्क्यांनी वाढली आहे. गार्टनर या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

मोबाइल बाजारात सॅमसंग सर्वोच्च स्थानावर असून या कालावधीत या कंपनीचा बाजारातील वाटा २२.३ टक्के इतका होता. तर त्याखालोखाल अ‍ॅपल या कंपनीचा वाटा १२.९ टक्के इतका नोंदविला असला तरी गेल्यावर्षीच्या १४.६ टक्के वाटय़ाच्या तुलनेत तो घटला आहे. या बाजारात चीनी ब्रँड्सनी चांगली प्रगती दाखविली असून हुवाई या कंपनीचा बाजारातील वाटा ८.९ टक्के तर ओपो या कंपनीचा वाटा ५.४ टक्के शिओमी या कंपनीचा वाटा ४.५ टक्के नोंदविण्यात आला आहे. इतर सर्व ब्रँड्सचा वाटा ४६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

काही प्रमाणात स्थिर असलेल्या बाजारात मोबाइलची मागणी कमी झाली आहे तर फिचर फोनची मागणीही खूपच घटल्याचे निरीक्षण गार्टनरचे संशोधन संचालक अंशुल गुप्ता यांनी नोंदविले आहे.

अ‍ॅपल या कंपनीला उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोप या सर्वात मोठय़ा बाजारपेठांमध्ये मोठा फटका बसल्याने त्यांच्या बाजारातील वाटय़ात घट झाल्याचे निरीक्षणही गुप्ता यांनी नोंदविले. तर बाजारातील सर्वाधिक वाटा ओपो या चीनी कंपनीचा वाढला असून ही वाढ १२९ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. या कंपनीने बाजारात आणलेल्या ‘आर९’ या मोबाइलमुळे कंपनीला बाजारात चांगले स्थान मिळाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बाजारातील वाटा

  • अँड्रॉइड – ८६.२ टक्के
  • आयओएस – १२.९ टक्के
  • विंडोज – ०.६ टक्के
  • ब्लॅकबेरी – ०.१ टक्के
  • इतर – ०.२ टक्के