पॅरिसमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यात एका व्यक्तीचे प्राण मोबाइलने वाचवले आहेत. नशीब बलवत्तर असेल तर काहीही घडू शकते तसे सिल्वेस्टर नावाच्या या व्यक्तीच्या बाबतीत झाले.

त्याने मोबाइल खिशात ठेवलेला होता. जेव्हा दहशतवादी गोळीबार करीत होते, आत्मघाती स्फोट करीत होते, तेव्हा आपण स्टॅडे डे फ्रान्स (स्टेडियमजवळ) या ठिकाणी होतो. त्या वेळी अचानक स्फोटाचा आवाज झाला क्षणार्धात मी कोसळलो, असे सिल्वेस्टर सांगतो, नंतर लगेच मी उठून उभाही राहिलो. माझ्या पोटाच्या ठिकाणी बनियनवर रक्ताचे काहीसे डाग होते पण स्फोटात जे अणकुचीदार पदार्थ उडाले होते त्यांचा आघात माझ्या सॅमसंग मोबाइलने झेलले होते. मोबाइलची पार वाट लागली, तो वेडावाकडा झाला पण त्याने तो दहशतवाद्यांचा तो वार झेलला, त्याची तीव्रता कमी केली. मी रस्ता ओलांडत असताना हा स्फोट झाला काहीतरी पदार्थ उडून माझ्याजवळून जात आहे हे समजत होते, मी पडलो अन् लगेच क्षणार्धात उठलोही.माझ्या सेलफोनने तो वार झेलला व मी वाचलो, असे त्याने या घटनेचे वर्णन केले आहे व त्याची व्हिडिओही व्हायरल झाली आहे. मोबाइल नसता तर आपल्या डोक्याच्या ठिक ऱ्या उडाल्या असत्या असेही सिल्वेस्टरने म्हटले आहे.

आयसिसने जबाबदारी स्वीकारली
पॅरिस येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सीरियातील आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत १५०हून अधिक जणांचे प्राण गेले आहेत. आयसिसने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पॅरिसवरील हल्ला जादूई असल्याचे म्हटले आहे.
रशियाचे विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारून दोन आठवडेही उलटले नसताना आयसिसने दुसरी दहशतवादी कारवाई केली आहे. मात्र, आयसिसचा हा दावा तपासला जात आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी या हल्ल्यासाठी आयसिस ही संघटनाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याची पद्धत अल कायदापेक्षा वेगळी आणि आयसिसशी मिळतीजुळती आहे, असेही ओलांद यांनी स्पष्ट केले. अरेबिक भाषेत लिहिलेल्या या निवेदनात आयसिसने या हल्ल्याला पाठिंबा दिला आहे.