‘पर्सन ऑफ द इयर’ या वार्षिक सन्मानासाठी ‘टाइम’ या साप्ताहिकाच्या वतीने निवडण्यात आलेल्या जागतिक नेते, व्यावसायिक आणि कला क्षेत्रातील ५० दिग्गज स्पर्धकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये या सन्मानाची घोषणा करण्यात येणार आहे. गतकाळातील आपल्या जीवनावर आणि प्रसारमाध्यमांवर ज्या व्यक्तीने आपला सर्वाधिक प्रभाव टाकला, मग तो चांगल्या कारणांसाठी असो वा वाईट, त्याला सन्मान जाहीर करण्यात येईल, असे ‘टाइम’च्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले.
मोदी हे एके काळी वादग्रस्त प्रादेशिक नेते म्हणून नावाजलेले होते. आज ते भारताचे पंतप्रधान बनले आहेत. आर्थिक विकासाच्या जोरावरच त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेतृत्व केले आणि एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, असे ‘टाइम’ने मोदींचा गौरव करताना म्हटले आहे. प्रभावी नेता म्हणून ‘टाइम’चे वाचक आपले मत देणार आहेत. त्यातून या साप्ताहिकाचे संपादक ५० जणांची सन्माननीय व्यक्ती म्हणून निवड करणार आहेत. मोदींना आजवर एकूण मतांपैकी ३.८ टक्के मते मिळाली आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर त्यांना जास्त मते मिळाली आहेत. याशिवाय नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसफझाई आणि पश्चिम आफ्रिकेतील इबोलाग्रस्त भागांत प्राणांची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांना मते मिळाली आहेत.