तरुणांना देशासाठी काम करायचे आहे. मात्र, भाजप सरकार त्यांना रोजगार देण्यास असमर्थ आहे. संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना सध्या पिकाची योग्य किंमत मिळताना अडचणी येत आहेत. मोदी सरकारने नोटाबंदी करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नरेंद्र मोदींनी कोणालाही न विचारता भारताच्या अर्थव्यवस्थेवर जबरदस्त आक्रमण केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. मोदींच्या निर्णयामुळे देशातील छोटे दुकानदार, व्यापारी यांना जबरदस्त झटका बसला आहे. त्यांनी जीएसटी कर आणला आणि लाखो लोकांचा व्यवसाय ठप्प झाला. जीएसटी हा एकमेव कर नसून पाच विविध कर आहेत. असा आरोपही त्यांनी केला. गुजरामधील द्वारका येथे ते बोलत होते.


राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या गुजराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रॅलींच्या माध्यमांतून सौराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यामध्ये अनेक रोड शो आणि सभांचा समावेश असणार आहे. या दौऱ्यादरम्यान, राहुल शेतकऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्याचबरोबर २६ सप्टेंबर रोजी ते राजकोट येथे व्यावसायिक आणि उद्योगपतींना भेटणार ही आहेत. गुजरातमध्ये या वर्षाअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानण्यात येत आहे. दरम्यान, गुजरात दौऱ्यावर निघालेल्या राहुल गांधींचे येथील युवानेता हार्दिक पटेल यांनीही टि्वटरद्वारे स्वागत केले.


दरम्यान, राहुल गांधी यांनी द्वारका येथिल श्रीकृष्ण मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी राहुल यांना त्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी या मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेले संदेश दाखवले आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.


दरम्यान, राहुल यांना २ ते ३ महिन्यांतून सारखे परदेशात का जावे लागत आहे. असा सवाल भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी विचारला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे तारिक अन्वर म्हणाले, गुजरातमध्ये सध्या भाजपच्या विरोधात वातावरण आहे. गुजरातमधील लोकांना आता बदल हवा आहे. जर योग्य प्रकारे निवडणूक प्रचार झाला तर येथे राहुल गांधींना यश मिळू शकते.