एनएसजीमध्ये प्रश मिळण्यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांना दूरध्वनी केला. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद आणि एनएसजीमध्ये भारताला प्रवेश मिळावा यासाठी रशियाचा पाठिंबा आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेत भर दिला. दोन्ही देशांमध्ये सहकार्य असलेल्या मुद्दय़ांवरच ही चर्चा केंद्रित होती, असे क्रेमलिनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एनएसजी बैठकीपूर्वी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचा मोदी यांचा प्रयत्न राहणार आहे. एनएसजीमध्ये भारताला प्रवेश देण्यास चीनने विरोध दर्शविला आहे, तर अमेरिकेचा भारताला पाठिंबा आहे, त्या पाश्र्वभूमीवर मोदी-जिनपिंग भेट महत्त्वाची ठरणार आहे. मोदी आणि पुतिन यांचीही लवकरच भेट होणार आहे.