भारतीय जनता पक्षाची स्वबळाची समीकरणे हरयाणा व महाराष्ट्रात यशस्वीपणे अमलात आणण्याचा आनंद साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी मंत्र्यांना सोमवारी सायंकाळी दिवाळी फराळासाठी निमंत्रित केले आहे. अत्यंत अनौपचारिक वातावरणात होणाऱ्या या ‘दिवाली मीलन’ कार्यक्रमासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात असलेले केंद्रीय मंत्री रविवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आहेत. सत्तास्थापनेपासून विविध मंत्रालयांची कामगिरी, कामात आलेल्या अडचणी, आपापल्या क्षेत्रातील राजकीय परिस्थितीवर नरेंद्र मोदी सहकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या चर्चेदरम्यान एकापेक्षा जास्त खाती सांभाळणाऱ्या मंत्र्यांना येणाऱ्या अडचणींवर मोदी चर्चा करतील. याच बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावराची चाचपणी केली जाणार आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
    ‘दिवाली मीलन’ कार्यक्रमाची सूचना अवघ्या दोनच दिवसांपूर्वी मंत्र्यांना देण्यात आली. महाराष्ट्र व हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्वबळाच्या कामगिरीनंतर खूश असलेले नरेंद्र मोदी सहकाऱ्यांशी पहिल्यांदाच अनौपचारिक चर्चा करणार आहेत. सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी आपल्या सहकाऱ्यांशी अशा रीतीने संवाद साधतील. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. सध्या प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, अरुण जेटली या मंत्र्यांकडे दोन खात्यांची जबाबदारी आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना जातीय वा प्रादेशिक समीकरणे सांभाळण्याऐवजी ज्या राज्यांमध्ये येत्या वर्षभरात विधानसभा निवडणूक आहे, अशा राज्यांना मंत्रिपद दिले जाईल. ज्यात प्रामुख्याने बिहार व झारखंडचा समावेश आहे. आपापल्या राज्यात असलेल्या प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कोणत्या योजना राबवल्या जातील, याचीही विचारणा मोदी दिवाळीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  या कार्यक्रमात  शिवसेना नेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थित राहणार आहे.