देशात निराशेचे वातावरण असले तरी अशाही माहोलमध्ये गुजरातच्या धर्तीवर देशाचा विकास होऊ शकतो, असा तरुणांच्या मनात आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न करून मोदींनी पंतप्रधानपदासाठी आपली दावेदारी प्रबळ करण्याचा प्रयत्न केला. भारत आता स्नेक चार्मर्सचा नव्हे तर माऊस चार्मर्सचा देश बनला आहे, असे नमूद करून मोदींनी कात टाकणाऱ्या बदलत्या भारताची क्षमता विद्यार्थ्यांंना त्यांच्याच भाषेत पटवून सांगितली.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारावर कुंभमेळ्यातील साधूंच्या आखाडय़ात शिक्कामोर्तब होणार असेल तर देशातील युवा पिढीचीही त्यावर मोहोर उमटली पाहिजे याचे भान ठेवून मोदींनी आज दिल्ली विद्यापीठातील सर्वात जुन्या महाविद्यालयांमध्ये समावेश होत असलेल्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांंचा ‘तास’ घेतला. सुमारे ९० मिनिटांच्या भाषणात  मोदींनी वारंवार गुजरातचा उल्लेख केला. तुम्हाला मिळणारे मीठ गुजरातहून आलेले असते आणि दूधही गुजरातचेच असते, याची त्यांनी जाणीव करून दिली. गुजरातच्या चौफेर विकासाच्या तुलनेत देशाची सर्वच आघाडय़ांवर होत असलेल्या दुरवस्थेकडे त्यांनी तरुणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सामान विकण्यासाठी चांगल्या पॅकेजिंगची गरज आहे, असे सांगत मोदींनी आपल्या कारकीर्दीत झालेल्या गुजरातच्या विकासाचा ताळेबंद मांडून स्वतचे जोरदार मार्केटिंग केले.
आमचा देश गरीब नाही. आमच्यापाशी नैसर्गिक स्त्रोतांची अपार संपदा आहे. पण मतपेढीच्या राजकारणाने देशाला प्रचंड नुकसान केले आहे. आम्हाला स्वराज्य मिळून साठ वर्षे उलटली, पण सुराज्य मिळाले नाही. युवा शक्तीचा नीट वापर केला जात नसल्याने देशात आज निराशेचे वातावरण आहे. व्यवस्थेवर जनता नाराज आहे. पण या निराशेच्या वातावरणातही विकास होऊ शकतो. संकल्प योग्य असेल तर उद्दिष्ट गाठले जाऊ शकते. कौशल्यासोबतच विकासाची व्याप्ती आणि वेग वाढविण्याची आवश्यकता आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रात विकास आवश्यक आहे. संधीचा वापर करणे हे मोठे आव्हान आहे. भारत जगातला सर्वात तरुण देश आहे. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांंखालील असून तिचा योग्य उपयोग होण्याची आवश्यकता आहे. . भारत देश गरीब नाही. गुजरातही भारतातच आहे. जर गुजरातचा विकास होऊ शकतो, तर भारताचीही विकास होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींचा तीव्र निषेध
८७ वर्षे जुन्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मोदींचे भाषण सुखासुखी झाले नाही. त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणाऱ्या विद्याथ्यार्ंचीही मोठी फौज महाविद्यालयापुढे जमली होती. मोदींना भाषणासाठी निमंत्रित केल्याबद्दल डावे पक्ष तसेच अन्य राजकीय पक्षांचे विद्यार्थी मोदी आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचा तीव्र निषेध करीत घोषणाबाजी करीत होते. दुसरीकडे मोदींच्या समर्थनार्थ अनेक विद्यार्थी जमले होते. त्यांना थोपविण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. विरोधक विद्यार्थ्यांंना पांगविण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्याचीही सज्जता पोलिसांनी केली होती. पण ही निदर्शने शांततामय वातावरणात संपली.