आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने आता ३१ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे. आधार आणि पॅन क्रमांक हे एकमेकांशी जोडल्याशिवाय विवरण पत्रावर पुढील कार्यवाही होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले.

सोमवारी केंद्रीय अर्थमंत्रलयाने ट्विटरवरुन आधार- पॅन लिंक करण्यासाठी महिनाभरासाठी मुदतवाढ जाहीर केली. आता ३१ ऑगस्टपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक करता येईल असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच प्राप्तिकर विवरण पत्र ऑनलाईन पद्धतीने भरताना आधार क्रमांक किंवा आधार कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केल्याचा क्रमांक भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधार आणि पॅन क्रमांक हे एकमेकांशी जोडल्याशिवाय विवरण पत्रावर पुढील कार्यवाही होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

आधार – ‘पॅन कार्ड’ला लिंक करण्यासाठी या सोप्या पद्धतीचा वापर करा

केंद्र सरकारने आधार आणि पॅनच्या जोडणीचा निर्णय घेतला असून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून यासाठी सरकारने जनजागृती केली होती. भारतीय नागरिकाची ओळख म्हणजेच आधार कार्ड आणि आर्थिक ओळख म्हणजेच पॅन कार्ड जोडून सरकारचा डाटाबेस भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे लाभार्थ्यांना सुविधा देण्यासोबतच बोगस पॅन कार्ड आणि आधार कार्ड तसेच करचुकव्यांवर वचक निर्माण होणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. यावर सुप्रीम कोर्टाने सरकारला निर्देश दिले होते. सरकारने आधार कार्ड सुरक्षित केले पाहिजे. ज्‍यामुळे आधारची माहिती उघड होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पॅनकार्डची बनावट रोखण्यासाठीही सरकारने उपाययोजना करायला पाहिजेत असे कोर्टाने म्हटले होते.