रविवारी रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारला जाब विचारला. केंद्र सरकार शेतकरीविरोधी आहे, या धोरणाचे परिणाम मोदी सरकारला चुकवावे लागतील, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. उलट हे सरकार ‘सूट-बूट’वाल्यांचे झाले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.  दरम्यान, गेले दशकभर सत्तेत असलेल्या ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांना लुटले आहे, त्याच काँग्रेसचे नेते आता शेतकऱ्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळत आहेत, या शब्दांत सरकारनेही काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला.
देशातील कृषी संकटावर चर्चेदरम्यान राहुल यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. गेल्या १० महिन्यांच्या काळात कृषी विकासात केवळ एका टक्क्याने वाढ झाली. परंतु मोदी सरकार  शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे.  देशात ६७ टक्के  जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांना दुखवून मोदी संकट ओढवून घेत आहेत, असे राहुल  म्हणाले.
राहुल यांचे भाषण सुरू असताना त्यांची पाठराखण करण्यासाठी ज्योतिरादित्य तयारच होते. एरव्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आक्रस्ताळे भाषण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची शैली न स्वीकारता राहुल यांनी स्वत:ची शैली विकसित केलेली दिसली. मोदींच्या कोटय़वधी रुपयांच्या सूटवरूनही राहुल यांनी भाजपला चिमटे काढले. सर्वोच्च नेत्याच्या जीवनशैलीवरून हिणवल्याने सत्ताधारी सदस्य चांगलेच संतापले व राहुल यांचा उद्देश सफल झाला. संसदीय नियमांचे राहुल यांनी विशेष पालन केले. संसदेत अनुपस्थित सदस्याचे नाव भाषणादरम्यान घेतले जात नाही. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही राहुल यांनी सोडले नाही.

‘काँग्रेसनेच शेतकऱ्यांना लुटले’
‘ज्या लोकांनी सातत्याने शेतकऱ्यांना लुटले आहे, तेच लोक आता शेतकऱ्यांच्या हितरक्षणाचा आव आणत आहेत. ज्या लोकांनी उद्योगांकडे देश गहाण ठेवला होता, तेच आता आम्ही उद्योगपतींच्या बाजूने असल्याचा कांगावा करीत आहेत, असा आरोप कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी केला.त्याआधी, संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही काँग्रेस, विशेषत: राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. ‘राहुलबाबू, तुम्ही ५० वर्षे सत्तेत होतात. तर आम्ही केवळ गेले ९-१० महिनेच सत्तेवर आहोत’ असे नायडू म्हणाले.