महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मंगळवारी दिलासा दिला. केंद्र सरकारने मंगळवारी संध्याकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले. याचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असून यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी कमी होणार आहे. आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत.

भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. २०१४ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त होते. त्यावेळी देशात पेट्रोलचे दर ८० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले होते. सध्या कच्चा तेलाच्या किंमती त्यातुलनेत कमी होऊनदेखील पेट्रोल ८० रुपये प्रतिलिटर या दरानेच मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या करामुळे पेट्रोल- डिझेलचे दर कमी होत नव्हते. यामुळे केंद्र सरकारवर चोहोबाजूंनी टीका सुरु होती. विरोधकांनीही यावरुन केंद्र सरकारला धारेवर धरले होते. भारतात पेट्रोल व डिझेलवर जवळपास १२० टक्के कर वसूल केला जातो. जगातील सर्वात महाग पेट्रोल- डिझेल मिळणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होतो.

पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाईदेखील वाढली होती. पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनही केले होते. अखेर वाढत्या दबावापुढे नमते घेत केंद्र सरकारने पेट्रोल- डिझेलवरील अबकारी करात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला. मंगळवारी पेट्रोलियम मंत्रालयाने या निर्णयाची माहिती दिली. मात्र कर कमी केल्याने केंद्र सरकारला हजारो कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. उर्वरित आर्थिक वर्षात सरकारचे सुमारे १३ हजार कोटी रुपयांचे महसूल बुडणार आहे.