मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेअंतर्गत आता सुपर कॉम्प्युटर भारतात तयार होणार आहे. याची सुरुवात तीन टप्प्यांमधील कार्यक्रमाने होणार असून विशेष म्हणजे या देशी सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीचे  काम पुण्यातील सीडॅककडे सोपवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ‘मेक इन इंडिया’ मोहीम महत्त्वाकांक्षी मानले जाते. आता या मोहीमेअंतर्गत सुपर कॉम्प्युटर भारतात तयार होणार आहे. नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशन अंतर्गत सुरुवातीच्या दोन टप्प्यांमध्ये हायस्पीड इंटरनेट स्विच आणि कॉम्प्यूट यासारखे उपकरणांची भारतात डिझाईन आणि निर्मिती करण्यात येणार आहे. ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेला गेल्या वर्षी मार्चमध्ये मंत्रिमंडळाच्या अर्थ समितीने मान्यता दिली होती.

योजनेचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून यावर पुण्यातील सीडॅक काम करत आहे. तीन टप्प्यांमध्ये ५० सुपर कॉम्प्यूटरची निर्मिती करण्याचे ध्येय आहे. या सुपरकॉम्प्युटरचा आराखडा, त्यासाठी लागणाऱ्या विविध उपकरणांची निर्मिती आणि ते जोडण्याचे काम ‘सी-डॅक’ करणार आहे. हे सुपर कॉम्प्युटर देशभरातील विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सुपर कॉम्प्युटरच्या या योजनेवर लक्ष ठेवणारे विज्ञान आणि प्रोद्योगिक मंत्रालयाचे वरिष्ठ वैज्ञानिक मिलिंद कुलकर्णी यांनी पहिल्या टप्प्यात सहा सुपर कॉम्प्युटर मिळतील अशी आशा व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात तीन सुपर कॉम्प्यूटर आयात केले जातील. उर्वरित तीन सुपर कॉम्प्यूटरसाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती विदेशात केली जाईल पण त्यांची जोडणी भारतात होईल. सहा सुपर कॉम्प्यूटर बनारस हिंदू विद्यापीठ, कानपूर, खडगपूर आणि हैदराबादमध्ये दिले जाणार आहेत. हे सुपर कॉम्प्युटर परमपेक्षाही जास्त वेगवान असतील.