पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उभय देशांतील संबंधांना बळकटी आणण्याच्या दृष्टीने पाकिस्तानला नवे संकेत दिले होते मात्र, फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी पाकने जवळीक साधल्यामुळे ही चर्चा रद्द झाली आणि पाकिस्ताननेच भारताबरोबरचे संबंध बिघडवले अशी ठाम भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी घेतली.
गेल्या महिन्यात इस्लमाबाद येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार होती. त्याआधीच पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांनी हुरियत नेत्यांची भेट घेतल्याने स्वत: पाकिस्तानेच या चर्चेत खोडा घातला आणि भारताला ही द्विपक्षीय चर्चा रद्द करावी लागली, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
भारताने द्विपक्षीय चर्चा रद्द केली होती त्यामुळे भारताने पुढाकार घेतला तरच पुन्हा चर्चा होऊ शकते, असे विधान पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताझ अझीझ यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, इथे पहिला किंवा दुसरा असा प्रश्न नाही. चर्चेसाठी पुढाकार आम्हीच घेतला होता. पाकिस्तानच्या कृतीवरील प्रतिक्रिया देणेही आवश्‍यक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रण दिले होते. त्यावेळी झालेल्या भेटीत उभय देशांतील व्यापारसंबंध सुरळीत होण्यासाठी वाघा-अट्टरी सीमारेषेवर त्वरित व्यापार सुरु करण्याचे ठरवण्यात आले होते, असेही स्वराज म्हणाल्या.
दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांची बैठक व्हावी, असा प्रस्ताव शरीफ यांनी मांडला आणि त्यास भारताने मान्यता दिली होती मात्र, प्रत्यक्ष चर्चेच्या चार दिवस अगोदर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट घेत वातावरण खराब केले, असे स्वराज यांनी सांगितले.