धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सौहार्दता या मुद्दय़ांवर मतभेद असले, तरी आर्थिक आघाडीवर आशादायी चित्र निर्माण होत असल्याचे देशवासीयांना वाटू लागले आहे.  असे सांगतानाच देशात शौचालयांच्या बांधणीवर योग्य तो भर दिल्याबद्दल नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे.
नवी दिल्लीत शनिवारी झालेल्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात बोलताना सेन यांनी सरकारी अनुदानाबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट केली. सार्वत्रिक शिक्षण व आरोग्य सेवा यांसारख्या आवश्यक राष्ट्रीय सेवा आणि अनुदानित घरगुती गॅस व डिझेल यांच्यात फरक करण्याकरता ‘सरकारी अनुदान’ ही संकल्पना नेमकी स्पष्ट व्हायला हवी, यावर त्यांनी भर दिला.
सध्या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या अमर्त्य सेन यांना वाजपेयी सरकारने १९९९ साली ‘भारतरत्न’ उपाधीने गौरवले होते. मात्र ते नरेंद्र मोदी यांच्या कडव्या टीकाकारांपैकी एक आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर  मोदींची विश्वासार्हता नसल्यामुळे त्यांनी देशाचे नेतृत्व करावे असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते.
काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात असा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सक्षम ठरले नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात मोदी यांनी ‘सर्वासाठी शौचालय’ असण्याच्या आवश्यकतेवर भर दिला होता. हे ऐकून मला आनंद झाला, असे सांगून सेन म्हणाले की, उघडय़ावर शौचाला बसण्याविरुद्ध आणि शौचालयांची आवश्यकता कशी आहे याबद्दल मी कित्येक वर्षे लिहीत होतो. मी मोदी यांची स्तुती करण्याचे हे दुसरे कारण आहे, की शौचालये नसल्यामुळे महिलांना जो त्रास सहन करावा लागतो, ती बाब लाल किल्यावरून बोलताना त्यांनी जनतेसमोर आणली, असे ते म्हणाले.
डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान देण्यास मी अनुकूल नाही, मात्र सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या आवश्यक सेवांसाठी ते दिले जायला हवे. आवश्यक सेवा कोणत्या हे मात्र सरकारला ठरविता यायला हवे. डिझेल आणि गॅसवर अनुदान देणे ही पूर्वीच्या सरकारची फार मोठी चूक होती, असे मत सेन यांनी नोंदवले. अन्नसुरक्षा कार्यक्रम आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) यांचीही पुनर्रचना आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
देशाची बहुसांस्कृतिक आणि बहुधार्मिक ओळख मान्य करण्यात रालोआ सरकार अपयशी ठरल्याची टीका सेन यांनी केली. भारताच्या इतिहासात देशाची हीच ओळख राहिलेली आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
एक गरीब देश किंवा राज्य सार्वत्रिक शिक्षण किंवा आरोग्यसेवा पुरवू शकत नाही, हा अतिशय वाईट आर्थिक तर्क आहे, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निवडक आणि जाणकार प्रेक्षकांमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय.व्ही. रेड्डी, अभिनेत्री शर्मिला टागोर, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन, आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव, भाजप खासदार पूनम महाजन, डिझायनर राजीव सेठी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला, ब्रिटिश पत्रकार मार्क टुली इत्यादींचा समावेश होता.

मी मोदींचा टीकाकार आहे हे खरे, परंतु मला हे सांगायचे आहे की, परिस्थिती बदलू शकते असा विश्वास  त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला. कदाचित मला ज्या रीतीने ते झालेले आवडले असते अगदी त्याच प्रकारचे हे नसेलही, पण तरीही जे झाले तेही उल्लेखनीय आहे. हे प्रशंसनीय आहे, मात्र धर्मनिरपेक्षता आणि इतर काही विषयांवरील आमचे मतभेद कायम आहेत.    – अमर्त्य सेन