ब्रसेल्समध्ये आठवडाभरापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात जगातील सर्व देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले. जगभरात दहशतवादाचा भस्मासूर वाढत चालला असल्याने त्याविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. बेल्जियममधील ब्रसेल्स एक्सपोमध्ये भारतीय नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, मोदींनी आपल्या भाषणात दहशतवादाच्या नेमक्या व्याख्येबाबत जागतिक स्तरावर अजूनही एकमत न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच संयुक्त राष्ट्राला दहशतवादाला खतपाणी घालणारे कोण आहे हे ओळखण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.